
Rajapur, Ratnagiri, Fire Accident, Municipal Corporatio
सचिन रहाटे यांच्या चालत्या दुचाकीला भीषण आग
पाणीपुरवठ्याची लाईन सोडण्यासाठी जात असताना घडली दुर्घटना
दुचाकीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच धावपळ
गोकुळ कांबळे, Rajapur News: राजापूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सचिन रहाटे यांच्या चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून, रहाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रहाटे हे सकाळी सात वाजताच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार कोंडेतड येथे पाणीपुरवठ्याची लाइन सोडण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात होते. प्रवास सुरू असतानाच त्यांच्या दुचाकीला अचानक आग लागली. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली.
राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
आग विझविण्यासाठी राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने दुचाकीला आगीने वेढले आणि काही वेळातच संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य केले. यावेळी नगरपरिषदेचे वाहनचालक दिलीप तांबे, भूपेश कनेरी, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव, साईकिरण कोठारकर, संदीप कुळी, प्रवीण शिंदे, निलेश बाणे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, भररस्त्यात चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने सचिन रहाटे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.