
Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती
पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
प्रभाग ८ अंतर्गत काविळतळी, गांधीनगर-वडार कॉलनी आणि वांगडे मोहल्ला या भागांमध्ये अनेक विकासकामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नगरसेवक पवार यांनी आमदार निकम यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आवश्यक असल्याने त्यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार निकम यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कामांची अंदाजपत्रके आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू केल्याने या कामांना केवळ आश्वासनाची नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाल्याचे चित्र आहे.
प्रस्तावित निधीतून प्रभागातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सुमारे ७५ लाख रुपयांत कानबांदल हायस्कूल ते राहुल गार्डन गेट, धनलक्ष्मी बिल्डिंग ते ग्रीन वूड अपार्टमेंट, जिव्हाळा बाजार ते नरेवाडी बंगला, कृष्णपुंज बिल्डिंग ते सोनिया रेसिडेन्सी तसेच सिद्धी अपार्टमेंटसमोरील मोरीपासून पराग भावे यांच्या घरापर्यंत आणि श्रमसाफल्य अपार्टमेंटपर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण प्रस्तावित आहे.
३२ लाख रुपयांत शंकरवाडी येथील डांगे घर ते गांधीनगर गुलमोहर अपार्टमेंटपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण होणार आहे. तर ४० लाख रुपयांच्या निधीतून गांधीनगर परिसरातील अंतर्गत आरसीसी गटारांची कामे केली जाणार आहेत. भागडेवाडीतील गटार व पाखाडीच्या कामासाठीही १५ लाख रुपये प्रस्तावित आहेत. याशिवाय गणपती विसर्जन घाटालगत ३० लाख रुपयांची सीसी संरक्षक भिंत, वांगडे मोहल्ल्यातील कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २० लाख रुपयांचे सोलिंग व पीसीसी काम, तर काविळतळीतील रोझी अपार्टमेंट ते फुलपाखरू गार्डन नाल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्लॅब मोरीपर्यंत ४२ लाख रुपयांचे आरसीसी गटार बांधकाम प्रस्तावित आहे.
प्रभागातील केवळ रस्ते आणि गटारांची कामेच नव्हे, तर सार्वजनिक उपयोगाच्या सुविधांनाही प्रस्तावात स्थान देण्यात आले आहे. ४५ लाख रुपयांत गणपती विसर्जन घाटाचे काम, तर आरक्षण क्रमांक १४३ येथील खेळाच्या मैदानासाठी ३० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रभागातील विकास आराखडा केवळ मूलभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि सार्वजनिक सुविधांकडेही वळल्याचे दिसते.
या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी अपेक्षित असला तरी निधीची प्रत्यक्ष उपलब्धता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया आणि कामांची गुणवत्ता हे पुढील टप्प्यातील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेली अंदाजपत्रक व कार्यालयीन प्रक्रिया ही प्रत्यक्ष विकासकामांची पूर्वतयारी मानली जात आहे. निधी वेळेत उपलब्ध होऊन प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यास प्रभाग ८ मधील दीर्घकाळ प्रलंबित कामांना प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते.
ठाण्यात क्लस्टर कंपनीविरोधात नागरिक आक्रमक; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा
या कामांमुळे काविळतळी, गांधीनगर-वडार कॉलनी आणि वांगडे मोहल्ला परिसरातील नागरिकांना रस्ते, पाणी निचरा आणि सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मंजूर निधीचा प्रभावी वापर, कामांचा दर्जा आणि ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण होणे, हे या विकास आराखड्याच्या यशाचे खरे मापदंड ठरणार आहेत. एकूणच, निधीचे आश्वासन आणि नगरपरिषदेची सुरू झालेली प्रशासकीय प्रक्रिया यामुळे प्रभाग ८च्या विकासाला चालना मिळाली आहे. आता या प्रस्तावित कामांचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामांत किती जलद आणि दर्जेदार पद्धतीने होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“नागरिकांनी ज्या विश्वासाने मला निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून प्रभागासाठी कायम मोठा निधी आणला जाईल,” असे नगरसेवक तथा गटनेते योगेश पवार यांनी सांगितले.