दुष्काळ दूर होण्यासाठी गणरायाला साकडे (फोटो- सोशल मिडिया)
सन २०२६ या वर्षात तब्बल तीन वेळा अंगारकी चतुर्थीचा योग आला असून गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या विशेष पर्वणीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि महाराष्ट्र समृद्ध व संकटमुक्त व्हावा, असे साकड़े अनेक भाविकांनी श्रींच्या चरणी घातले.
Ganpatipule News: अंगारकी चतुर्थीनिमित्त ५० हजारहून अधिक भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
दर अंगारकीला श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे अलोट गर्दी उसळते, मात्र या वेळी भाविकांच्या संख्येत घट नोंदवली गेली. मंदिर देवस्थान प्रशासनाकडून भाविकांसाठी दर्शनाचे चोख नियोजन करण्यात आले होते आणि मंदिर परिसरात तब्बल ३९ दर्शन रांगाची आखणी करण्यात आली होती. चालू वर्षातील तीन अंगारकीचे योग संपल्यानंतर आता पुढील अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी भाविकाना काही महिने वाट पहावी लागणार आहे. पुढील अंगारकीचा योग बेट १९ महिन्यांनंतर म्हणजेच २२ जून २०२७ रोजी येणार आहे. त्यामुळे भाविकांना या विशेष पर्वणीसाठी आता पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत श्रीचे आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, ही प्रार्थना
गणपतीपुळे मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी अमित धनवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवस्थान प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्वतोपरी सज्जता ठेवली होती. मात्र, सध्याच्या हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने उभे ठाकलेले दुष्काळाचे सावट, नुकताच झालेला गणेशोत्सव आणि सध्या सुरू असलेला पितृपंधरवडा या सर्वांचा एकत्रित परिणाम भाविकांच्या उपस्थितीवर जाणवला.
या अंगारकीला भाविकांच्या संख्येत ३५ ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. ‘बाप्पाला आता एकच साकडे आहे की, पर्जन्यवृष्टी समाधानकारक होऊ दे आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे’, अशी प्रार्थना मुख्य पुजाऱ्यांनी श्रीच्या चरणी केली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा आणि नागरिक संकटात असल्याने मंदिरातही पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.






