कोकणात उन्हाळा वाढणार (फोटो- सोशल मीडिया)
कोकणातील उन्हाळा वाढणार
उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा
रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांत ‘हिटवेव्ह’
रत्नागिरी: मार्चच्या सुरुवातीला वाढलेला उकाडा आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत परिस्थितीत पुन्हा बदल झाला असून, रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्ह्यांत तीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत पोहोचू शकतो. काही भागांत गारपीट होण्याचाही अंदाज आहे. दुसरीकडे, मुंबईसह संपूर्ण कोकण पट्टधात मात्र पावसाची शक्यता नसून तापमान झपाट्याने वाढणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशात सध्या मजबूत वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय आहे
उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा
या प्रणालीमुळे हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे ओलसर वारे हिमालयात धडकून उत्तर भारतात पाऊस व हिमवृष्टी घडवून आणतात. यावेळचा डिस्टरबन्स अधिक प्रभावी असल्याने त्याचा परिणाम देशभर जाणवत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेत ओलावा वाढला आहे.
हा ओलावा उष्ण हवेच्या संपर्कात आल्याने ढगांची निर्मिती वेगाने होत असून, काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे. एकीकडे कोकणात उष्णतेचा कडाका वाढणार असताना, पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाचा इशारा कायम असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे पहाटे व रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसा उन्हाचा चटका वाढणार आहे. कोकण आणि गोवा पट्टधातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून, पावसाची शक्यता नाही. परिणामी, या भागांत उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मार्चमध्येच पारा 40 अंशावर
यंदाच्या हंगामात उष्णतेने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कहर केला आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच कमाल तापमान 42 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तसेच काही दिवस तापमानात घसरण झाली असून मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला. आता पुन्हा शहर आणि उपनगरांता तीव्र उन्हाचे चटके बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. परिणामी 12 ते 4 घराबाहेर पडताना काळजीपूर्वक बाहेर पडा. कारण गेल्या १० मार्च रोजी मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे.






