
Uday Samant
Maharashtra Drought : रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी पाणी नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पीक परिस्थिती आढावा बैठकीत सामंत बोलत होते. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पिकांचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी उर्वरित तालुक्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. पाऊस आणखी लांबल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी नियोजन आराखडा तयार ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
पीक पंचनामे करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने काम करावे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. पंचनाम्यावेळी शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार तपशील आणि ई-केवायसी अचूकरीत्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याची ‘ॲग्रीस्टॅक’मध्ये नोंदणी होईल, याची दक्षता तलाठी आणि ग्रामसेवकांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले. नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेरगावी स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या शेतीचेही पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात मार्च २०२७ पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. भात कापणीनंतर उपलब्ध होणारा पेंडा खरेदी करण्यासाठी विशेष निधीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
जलसंधारणाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवारअंतर्गत २३३ गावांमध्ये कामे सुरू असून मोठ्या २० धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आगामी टंचाई लक्षात घेता जिल्हाभर ‘वनराई बंधारे’ बांधण्याची मोहीम राबवण्याचे निर्देश सामंत यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांचे प्रकार आणि व्याप्ती निश्चित करून अग्रणी बँकेने कर्ज पुनर्गठनाचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल माफ असून त्यावरील पंपांनाही सवलत देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे निकष शिथिल करणे आणि दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.