फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
चिपळूण (प्रतिनिधी) : भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात ४ आणि ५ जानेवारी 2025 रोजी वालावलकर रुग्णालयात हातांच्या अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया शिबिरामध्ये इंग्लंड येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. रघुनंदन कानविंदे हे रुग्णावर उपचार करणार आहेत.
डॉ. कानविंदे हे इंग्लंड येथील बंगर युनिव्हर्सिटी मध्ये गेली तीस वर्षे सेवा देत आहेत. आता मात्र ते कोकणवासीयांसाठी दर शुक्रवार ते रविवार डेरवण रुग्णालयात सेवा देणार आहेत. ज्या रुग्णांना हाताच्या संधी वातामुळे बोटे वाकडी झालेली आहेत, ज्यांच्या हाताच्या बोटातून मुंग्या येत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या हाडांना गाठी आहेत, ज्या रुग्णांच्या मनगटाला वेदना होत आहेत, ज्या रुग्णांना हाताच्या मनगटाची हाडे, तळव्याची हाडे, बोटांची हाडे यांना फ्रॅक्चर झालेले आहे, ज्या रुग्णांना स्लिप फिंगर आहे अशा सर्व रुग्णांनी वालावलकर रुग्णालयातील ओपीडी विभागातील अस्थिरोग ओपीडी नंबर ४ मध्ये शस्त्रक्रिया शिबिरापूर्वी येऊन तपासणी करून घ्यावी. हातावरील अस्थिरोगावरील शस्त्रक्रियेमध्ये डॉ. कानविंदे यांचा हातखंडा आहे. ते वालावलकर रुग्णालयात रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया उपचारासाठी उपलब्ध असतात.
शिबिरात ‘या’ प्रमुख डॉक्टरांचीही उपस्थिती
सदर शिबिरासाठी हातावरील शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभिजीत वाहेगावकर उपस्थित राहणार आहेत. डॉ. वाहेगावकर यांनी मेयो क्लिनिक अमेरिका येथून हाताच्या शस्त्रक्रियेमध्ये फेलोशिप केलेली आहे. ते गेली १५ वर्षे पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत आहेत. ते महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत.
मुंबई येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेजचे ऑर्थोपेडिक प्रोफेसर व युनिट इन्चार्ज डॉ. अशोक घोडके हे देखील या शस्त्रक्रिया शिबिरास उपलब्ध असणार आहेत. तसेच मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रशांत कांबळे हे सुद्धा शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आवाहन
कोकण विभागातील हाताचे अस्थिरोग असलेल्या रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा. शस्त्रक्रिया शिबिरापूर्वी रुग्णांनी रुग्णालयात येऊन शस्त्रक्रिया पूर्व तपासणी एक्स रे, सी. टी.स्कॅन किंवा एम.आर.आय इत्यादी चाचण्या करून घ्याव्यात. रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोकणवासियांना मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी बहुतांशवेळा मुंबई गाठावी लागते तर तळकोकणातील लोक ही कोल्हापूरात जातात. मात्र रत्नागिरीमध्ये वालावलकर रुग्णालयात वाढत असलेल्या साई सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची फौज यामुळे हे रुग्णालय कोकणवासियांसाठी एक प्रमुख रुग्णालय झाले आहे. आता परदेशातील डॉक्टरांकडून घेण्यात येणाऱ्या शिबिरामुळे तर अजूनच फायदा लोकांना होणार आहे.