फोटो - टीम नवराष्ट्र
अमरावती : लोकसभा निवडणूकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकीपूर्वी अमरावतीमध्ये राजकारण रंगले आहे. प्रहार नेते व आमदार बच्चू कडू व राणा दाम्पत्य यांच्यामध्ये अनेकदा वाकयुद्ध होत असते. आता पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बच्चू कडू लवकरच सरकारमध्ये राहणार की नाही याबाबत निर्णय घेणार आहे. आज (दि.10) बच्चू कडू यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू हे निवडणूका जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या नावेने मते मागून राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
काय म्हणाले रवी राणा?
भाजप आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बच्चू कडूंवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, “राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेतात. बच्चू कडू जे मुद्दे आता मांडत आहेत. ते मुद्दे ज्यावेळेस ते अडीच वर्ष मंत्री होते त्यांच्याकडे तेरा खाते होते, त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते मोठं काम केलं ते त्यांनी सांगावे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पुनर्वसनाचे काम सुद्धा केले नाही. त्यांचे अचलपूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतला जाते मात्र अजूनही एका संत्र प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला नाही. निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. बच्चू कडू यांनी सर्वात आधी अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेत घेतली त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे ते पहावे, शिवभोजन योजना पण त्यांनी स्वतःच्या घरात घेतली. शेतकऱ्याबद्दल जर त्यांना जिव्हाळा असतातच 33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही ?” असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे.
नौटंकी करत ब्लॅकमेलिंग करतात
पुढे ते म्हणाले, “आचारसंहितेच्या आधी आंदोलन करून बच्चू कडू हे राजकारण करत आहे, सरकारला ब्लॅकमेल करत आहे. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंचे वैयक्तिक मोठं कामं केले आहे. बच्चू कडू हे संभाजीनगरमध्ये जाऊन नौटंकी करत आहे. पण त्याआधी आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय द्यावा. आज ते नौटंकी करून याला त्याला भेटत आहेत. ब्लॅकमेलिंग करत आहे हे महाराष्ट्रातील लोकांना समजे, तुम्ही काय केलं ते सांगा,” अशी टीका रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे.
आनंदराव अडसूळ व बच्चू कडू हे कटप्पाच्या भूमिकेत
अमरावतीमधील शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अमित शाह यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच राणा दाम्पत्याला महायुतीमधून बाहेर फेकावे असे अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत. यावर देखील रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “मी आनंदराव अडसूळ यांना सन्मान दिला पण, आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं, त्यांनी सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आपलं वय काय आपण बोलतो काय? मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही हे सांगणारे अडसूळ कोण? ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे, उद्याही महायुतीमध्येच राहील पण त्यांनीच आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होते. आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीत खंजीर खुपसला आहे,” अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली आहे.