बारामती : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्याचं राजकारण चांगलचं तापत चाललं आहे. अशातचं आता राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही जबर धक्का बसला आहे. जानकर यांच्या हुकुमशाही पद्धतीला कंटाळून साथ सोडण्याचा मोठा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रीय समाज पक्षात देखील उभी फूट पडली आहे.
पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बारामती येथे बैठक पार पडली. या बैठकीला तब्बल 22 जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये धुसपुस सुरू होती. आज झालेल्या बैठकीत ही खदखद बाहेर पडली. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये महादेव जानकर यांच्या विचारसरणीला बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.
नेमकं कोणते निर्णय घेतले?
धनगर आरक्षणाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय धनगर समाजाचे प्रश्न यशवंत सेनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांना हीन वागणूक देत असल्याने त्यांना कंटाळून आम्ही त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला, असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
[read_also content=”जबाब नोंदवणीसाठी हजर रहा; संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/be-present-for-recording-of-answer-shivdi-court-order-to-sanjay-raut-nrdm-305559.html”]
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि त्यागातून उभा राहिला आहे. त्यामुळे यापुढे पक्षावर आमचाच हक्क आहे. पक्षावर आमचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढण्याची तयारी असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेने प्रमाणेच पक्षाच्या अध्यक्षांना बाजूला ठेऊन पक्षावरच हक्क सांगितला जात आहे.