सांगली जिल्हा बँकेसाठी रेकॉडब्रेक 351 अर्ज; आजी, माजी आमदार-खासदारांसह दिग्गजांचा समावेश
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी अखेरच्या दिवशी 147 जणांनी अर्ज दाखल केले. तर जिल्हा बँकेसाठी 21 जागांसाठी रेकॉर्डब्रेक 351 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सोमवारी (दि. 5) छाननी होणार आहे. मात्र, छाननीमध्ये नेमके कोणाचा अर्ज बाद होणार, याबाबतची धाकधूक उमेदवारांना लागली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जामध्ये आजी, माजी आमदार आणि खासदारांसह दिग्गजांचा समावेश आहे, त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 22 सप्टेंबर रोजी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 147 जणांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या काही जणांनी यापूर्वी अर्ज भरला असतानाही डमी अर्ज भरल्याचे पाहायला मिळाले.
या अर्जांमध्ये आमदार इद्रिस नायकवडी, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, बँकेचे विद्यमान संचालक महेंद्र लाड, अजितराव घोरपडे, प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे, दिनकर पाटील, कडेगाव पंचायत समितीचे सभापती जितेश कदम, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बसवराज पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, सदाशिव खाडे, सिकंदर जमादार, केदार नलवडे, बाजार समितीचे माजी उपसभापती महादेव अंकलगी, बाजार समिती संचालक बाबासो माळी, किरण लाड, समित कदम, प्रतिभा पाटील, वैभव पवार, निलेश येसुगडे, हणमंत देशमुख यांच्यासह 147 जणांनी अर्ज दाखल केले.
जिल्हा बँकेसाठी दाखल झाल्या अर्जांची सोमवारी (दि.5) रोजी छाननी होणार आहे. यावेळी प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे कोण कोणाचा काटा काढणार, कुणाला रिंगणातून बाजूला व्हावे लागणार हे छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेसाठी अनेक दिग्गजांचे अर्ज
खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुरेश काळे, सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, माजी आमदार अजितराव घोरपडे, विक्रमसिंह सावंत, सुमनताई पाटील, विद्यमान संचालक महेंद्र लाड, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, चिमण डांगे, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, अनिता सगरे, अमोल बाबर, देवराज पाटील, विराज नाईक, रणधीर नाईक यांच्यासह दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत.






