
'संतोष देशमुख हत्येप्रकरणाचा खटला चालवण्यासाठी उज्ज्वल निकमांना केली होती विनंती'; मुख्यमंत्र्यांची माहिती
नागपूर : बीडमधील संतोष देशमुख खूनप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना खटला चालवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनीच नेमणूक केल्यास राजकारण होईल, म्हणून वकीलपत्र घेणे योग्य वाटत नसल्याचे कळविले. निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे म्हणजे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: फडणवीस-निकम यांची भेट; धनंजय देशमुख म्हणाले, “सरकारी वकील म्हणून…”
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडप्रकरणी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्याचा माझा विचार सुरू आहे. मात्र, त्यांनीच राजकारण होईल असे कळवत विनंती केली. त्यांनी आजवर जी प्रकरणे हाताळली, त्यात आरोपीला शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूवी अॅड. निकम यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हपासून याप्रकरणी त्यांना वकीलपत्र दिले जाईल, अशी चर्चा होती. आता या प्रकरणातील वकिलपत्रावरून माहिती समोर आली आहे.
दरम्यान, निकम यांनी भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पराभूत केले. तेव्हापासून निकम यांच्यावर भाजपचा वकील असा ठपका पडला.
सैफ अली खान हल्लाप्रकरण गाजतंय
सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरणही राज्यात चांगलेच गाजत आहे. हल्ल्यावरून मुंबईही सुरक्षित नाही, अशी टीकाही केली आहे. त्यावर ‘या हल्ल्याप्रकरणी आपण सांगायचे ते आधीच सांगितले आहे. पोलिसांनीही सर्व माहिती दिली आहे. त्या पलीकडे आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही. पोलिस त्यांचे काम करत आहे’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीत केजरीवाल यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला असून, मोदींच्या नेतृत्वात तिथे विजय मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी केला.
तुरुंगात असतानाच आरोपी विष्णू चाटेने केलेली विनंती मान्य
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आठ आरोपींपैकी 7 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा विष्णू चाटे याला गेवराई इथल्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, विष्णू चाटे याने न्यायालयाकडं मला लातूर कारागृहात ठेवावं, अशी मागणी केली. त्यामुळे न्यायालयानं विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी केली आहे.
हेदेखील वाचा : रायगडचे पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना जाहीर होताच भरत गोगावले समर्थकांचा राडा; महामार्गच धरला रोखून