File Photo : Protest
महाड / चंद्रहास नगरकर : महायुतीचे रायगड जिल्हा पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नामदार आदिती तटकरे यांना जाहीर झाले आहे. त्यावरूनच रायगडमधील शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, या नाराज झालेल्या शिवसैनिक व नामदार भरत गोगावले समर्थकांनी शनिवारी रात्री उशीरा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गच रोखून धरला.
हेदेखील वाचा : सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर; कोणता नेता कोणता जिल्हा सांभाळणार? यादी पहाच
रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांनाच मिळणार अशी शिवसैनिकांना खात्री होती. मात्र, ते आदिती तटकरे यांना मिळाल्याने शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी महाड तालुक्यातील नडगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्त्याच्या मधोमध गाड्यांचे टायर पेटवून गोगावलेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच हे पालकमंत्रिपद गोगावले यांना न मिळाल्याची भावना शिवसेनेच्या मनात निर्माण झाल्याने आंदोलनादरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस तसेच अग्निशमन यंत्रणा दाखल झाली होती. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.
धनंजय मुंडेंनाही पालकमंत्रिपद नाही
राज्यातील विविध जिल्ह्यांसाठीच्या पालकमंत्रिपदाची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला आहे. बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांना मिळणार की नाही याची चर्चा असतानाच त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आले. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे.
मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद…
बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. ‘आपण स्वत:च आपल्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी नको अशी विनंती केली होती. मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती’ असे मंत्री मुंडे यांनी म्हटलं आहे.
हेदेखील वाचा : तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्राचा समृद्ध आणि आधुनिक विकास; ‘इज ऑफ लिव्हिंग’मध्ये वाढ करण्याचा निर्धार






