
कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
कराड : कराड एमआयडीसीसह सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांची कामे आणि उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न अधिक काळ लांबवू नयेत. संबंधित प्रश्नांवर येत्या आठ दिवसांत निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कराड येथे उद्योजकांसमवेत आयोजित आढावा बैठकीत सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, ‘मास’चे अध्यक्ष धैर्यशील भोसले, संजीवराजे नाईक निंबाळकर, विविध विभागांचे अधिकारी, प्रमुख उद्योजक तसेच उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कराड एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था हा बैठकीतील प्रमुख मुद्दा ठरला. रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांसाठी आवश्यक प्रस्ताव आठ दिवसांत मंजूर करून घेण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
न्यायप्रविष्ट जागेमुळे एमआयडीसीच्या प्रवेशमार्गात निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी महामंडळाच्या स्वतःच्या जागेतून नवीन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग उभारण्याबाबतही त्यांनी सूचना केली. उद्योजकांना विविध शासकीय परवानग्या मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी ‘मैत्री’ पोर्टल आणि एक खिडकी योजनेची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
खंडाळा-शिरवळ औद्योगिक वसाहतींच्या अतिरिक्त भूसंपादनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देताना फलटण येथील भूसंपादनाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देशही सामंत यांनी दिले. म्हसवड एमआयडीसीसाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याने तेथील भूसंपादन आणि उभारणीची कामे त्वरित सुरू करण्यास त्यांनी सांगितले. वाई एमआयडीसीमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सीएसआर निधीतून सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्यास इच्छुक उद्योजकांना औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
नवउद्योजकांना कर्जासाठी बँकांनी सहकार्य करावे
लघु उद्योजक आणि नवउद्योजकांना भांडवलाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी बँकांनी कर्जवाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सामंत यांनी केले. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कराड एमआयडीसी परिसरात सातारा येथील कामगार रुग्णालयाची उपशाखा सुरू करण्याचा प्रस्तावही बैठकीत पुढे आला. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.