कल्याण: कल्याणमधील (Kalyan News) कवयित्री विशाखा विश्वनाथ (Vishakha Vishwanath) यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार (Sahitya Akademi Award) जाहीर झाला आहे. ‘स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना’ हा त्यांचा कविता संग्रह आहे. ‘स्वत:ला स्वत: विरुद्ध उभं करताना पाठीशी असावं कुणी म्हणून म्हणायची असते प्रार्थना..’ या कवितेच्या ओळी आहेत. विशाखा यांना हा पुरस्कार मिळाल्याने कल्याणकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
विशाखा यांचा जन्म जळगावमधील चाळीसगाव येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगरच्या यशवंत विद्यालयात झाले. सध्या त्या कल्याणच्या लोकउद्यान येथे राहतात. त्यांचे वडिल मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत आहे. त्यांनी इजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचं ठरविले. मात्र इंजिनिअरिंगमध्ये त्यांना ड्रॉप लागला. इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडल्यावर त्यांनी उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयातून मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्या सध्या एमबीए करीत आहेत.
वडिल शिक्षण विभागात नाेकरीला आणि घरात कोणतीही पार्श्वभूमी नसताना मराठी हिंदी चित्रपटांकरीता कॉपीरायटिंगच्या क्षेत्रात काम करणे प्रवासच काव्यसंग्रहाचं उगमस्थान असल्याचं विशाखा यांनी सांगितलं. त्यांच्या गमभन प्रकाशन हे या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आहेत. हा काव्य संग्रह 21 मे 2022 साली प्रकाशित झाला. मराठी साहित्य वाचनाची भूक त्यांच्यामध्ये त्यांच्या शिक्षकांनी वाढीस लावली. कुसूम पाटील ते प्रज्ञा दया पवार यांच्या संस्कारामुळे त्यांना वाचनाची आवड लागली. त्यांचा हा पहिला काव्य संग्रह असला तरी त्यांना दासू वैद्य आणि महेश लोंढे हे कवी जवळचे वाटतात. सोशल मीडियाच्या वापराबाबत बोलताना विशाखा यांनी सोशल मीडियावर लोक अभिव्यक्त होत आहेत. त्याचा कितपत वापर करावा. कारण सोशल मीडियाचा वापर विवेकी असावा. त्याचा अतिरेक होऊ नये. त्यांच्या कविता या डायरीतील कविता नसून त्या फेसबुकवर लिहिलेल्या कविता आहेत,याची कबूली विशाखा यांनी दिली आहे.
नव्वदच्या आसपास जन्माला आलेल्या पिढीच्या भाव भावनांचे चित्र या कविता संग्रहातील कविता अधोरेखीत करतात. घरातील संस्कार आणि जागतिकरण, कार्पोरेट जगत. यात सगळयात टिकून राहण्यासाठीची धडपड यांचे मिश्र भावविश्व या कवितांमध्ये आहे. जेव्हा स्वत:ला काही जाणवते. तेव्हा ते शेअर करण्यासाठी कोणी सापडत नाही. ते अपसूकच कागदावर उमटते. त्याची कविता होते असे मला वाटते. तेच मी लिहित गेले. त्याच्या कविता होत गेल्या. त्याला साहित्य आकादमीचा युवा पुरस्कार मिळाला याचा मला आनंद असल्याचे विशाखा यांनी सांगितले.






