Salman Khan Shooting Accuseds Suicide Is A Big Conspiracy In State Shiv Senas Thackeray Faction Leaders Allegation Nryb
सलमान खान गोळीबारातील आरोपीची आत्महत्या हा राज्यातील मोठा कट; शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
Salman Khan House Firing Case : हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, बडे राजकीय व्यक्तीदेखील असू शकतात, अशी शंकाही ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली. मूलत: या प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळातसुद्धा खळबळ उडाली आहे.
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना पंजाबमधून अटक केली होती. त्यापैकी एक आरोपी अनुज थापन याने बुधवारी (1 मे रोजी) तुरुंगात चादरीने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे उघडकीस झाले आहे. मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या गुन्हे शाखेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील लॉकअपमध्ये आरोपी अनुज थापनला ठेवण्यात आले होते.
तुरुंगात गळफास लावून आत्महत्या
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार (Salman Khan House Firing Case) करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या अनुज थापन याने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना म्हणजे मोठा कटच असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्याने केला आहे. पोलीस कोठडीत हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी, बडे राजकीय व्यक्तीदेखील असू शकतात, अशी शंकाही ठाकरे गटाच्या नेत्याने व्यक्त केली.
या घटनेत बडे अधिकारी, राजकीय नेते असण्याची शक्यता
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी म्हटले की, मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कोठडीत आरोपीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मोठे पोलीस अधिकारी, राजकीय नेता देखील सहभागी असू शकतो अशी शंकाही आनंद दुबे यांनी उपस्थित केली. त्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.अनेक अधिकारी असतात. तरीही अशी घटना घडते म्हणजे ही घटना एक प्रकारे कटच असल्याची शंका दुबे यांनी व्यक्त केली.
फडणवीसांना आवाहन करणार….
आनंद दुबे यांनी म्हटले की, हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शौचालयात केली आत्महत्या…
बुधवारी एक मे रोजी, अनुज थापन हा बराच वेळ झाला तरी शौचालयातून बाहेर आला नाही. त्याला वारंवार हाका मारुनही प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी बळजबरीने शौचालयाचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला तातडीने गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
अनुजच्या कुटुंबीयांनी केली मागणी…
प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अनुजच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईबाहेर करण्याची मागणी केली आहे. अनुज थापनचा भाऊ अभिषेकने म्हटले की, अनुजने आत्महत्या केली नाही. त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी त्याने केली.
मुंबई पोलिसांची कारवाई
सलमान खानच्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी 72 तासांच्या आत गुजरातमधील भूज येथून बेड्या ठोकल्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांना शस्त्र पुरवणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक केली.
Web Title: Salman khan shooting accuseds suicide is a big conspiracy in state shiv senas thackeray faction leaders allegation nryb