महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ४ दिवस बाकी आहे. तरीही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आघाडीतील तिन्ही पक्षांचं ८५-८५-८५ च्या फार्म्युल्यावर एकमत झालं आहे. मात्र मित्रपक्षांकडूनही अनेक जागांवर दावा केला आहे. समाजवादी पक्षाने तर महाविकास आघाडीकडे ५ जागांची मागणी केली असून उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. निर्णय झाला नाही तर २५ जागांवर निवडणूक लढण्याचाही इशारा सपाने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष अबू आजमी यांनी शुक्रवारी शरद पवारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 5 जागांची मागणी केली असून यावर निर्णय देण्यासंदर्भात शनिवारीची अंतिम तारीख दिली आहे. यावर अबू आजमी यांनी, “मी 5 जागा मागितल्या आहेत. यात दोन विद्यमान जागा (भिवंडी पूर्व आणि मानखुर्द) आहेत. तसेच भिवंडी पश्चिम, मालेगांव आणि धुळे शहर अशा अन्य तीन जागांची मागणी केली आहे. या जागांवर सपाचे उमेदवार नक्की निवडून येतील. त्यामुळे या जागांसाठी आमचा आग्रह आहे.”
आम्ही शनिवारी दुपारपर्यंत प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ. मी 25 उमेदवारांची घोषणा करू शकतो. अखिलेश यादव यांनी मला सांगितले आहे की महाराष्ट्रात मी निर्णय घेणारा आहे. जर नवाब मलिकांना आवडत असेल, तर ते मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. जर तुम्ही अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व दिले नाही, तर ते निवडणूक लढतील आणि तुमच्याकडे आणखी एक हरियाणा होईल, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला लगावला आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही, राज्यात भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव होणार आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान बुधवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत तीन मोठ्या पक्षांनी 85-85-85 जागांचे वाटप करण्याची घोषणा केली होती. तथापि, अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा अद्याप सुरू आहे. तीन पक्ष 288 पैकी उर्वरित 33 जागा एकमेकांमध्ये आणि लहान पक्षांमध्ये वाटपावर चर्चा करीत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, 288 जागांपैकी 270 जागांवर सहमती झाली आहे. राऊत म्हणाले, “ समाजवादी पक्ष, पीडब्ल्यूपी, सीपीआय (एम), सीपीआय आणि आप यांना समाविष्ट करू. उर्वरित जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. महायुतीला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सर्व पक्ष एकत्र लढणार आहेत.”
महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. मागील निवडणुकीत बीजेपीला 105, शिवसेनेला 56, एनसीपीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तथापि, निवडणुकेनंतर शिवसेना एनडीएपासून वेगळी झाली आणि एनसीपी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने् मुख्यमंत्री बनले. आता शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. शरद पवार यांची एनसीपीही दोन गटांमध्ये विभागली गेला आहे.
सध्या महायुतीत बीजेपीचे 103, शिवसेना (शिंदे) च्या 40, एनसीपी (अजित पवार) च्या 40 आणि बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार आहेत. महाविकास आघाडीत, काँग्रेसचे 43, शिवसेना (ठाकरे) 15 आणि एनसीपीचे (शरद पवार) 13 आमदार आहेत. समाजवादी पार्टीचे दोन, एआयएमआयएमचे दोन, पीजेपीचे दोन, एमएनएस, सीपीएम, शेकाप, स्वाभिमानी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, महाराष्ट्र जनसुराज्य शक्ति पार्टी, क्रांतिकारी शेतकारी पक्षाचा एक-एक आमदार आहेत.