फोटो - टीम नवराष्ट्र
संभाजीनगर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूकीपूर्णी मोठी घोषणा केली होती. लोकसभा हारल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे. भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांना थेट आव्हान देखील दिले आहे.
काय म्हणाले खासदार संदीपान भुमरे?
संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संदीपान भुमरे म्हणाले, “चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटलेली नाही. खैरेंना म्हणाव औरंगाबाद पश्चिममध्ये पहिल्यांदा उमेदवारी आण. पहिली उमेदवारी आणा म्हणाव नंतर आपण बघूयात. उमेदवारी आणा त्यात तुमची पहिली पात्रता आहे. उमेदवारी आणल्यावर तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय आहे आणि तुम्ही कोण आहात,” असे थेट आव्हान संदीपान भुमरे यांनी दिले
पुढे ते म्हणाले, “चंद्रकांत खैरेंची हौस फिटू शकत नाही. त्यांनी आता फक्त नेतेगिरी करावी, त्यांनी निवडणुकीत उभा राहू नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. खैरेला मातोश्रीवर आता कोणीही विचारत नाही. त्यांना उमेदवारीही मिळणार नाही. त्यांना मातोश्रीवरही कोण येऊ देत नाही. उभा राहिलेच तर डिपॉझिट जप्त करुन दाखवू. संजय शिरसाट यांच्यावर अन्याय झालेला नाही. शिंदे साहेब सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं शिरसाट साहेबांना देखील न्याय भेटेल. चंद्रकांत खैरेंची हौस अजून फिटलेली नाही,” असे प्रत्युत्तर संदीपान भुमरे यांनी दिले आहे. यावर आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.