छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार (State Govt) व केंद्र सरकारवर जहरी टीका केली. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Temple inauguration) हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटातील आमदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ‘तुम्ही नरेंद्र साहेबांची बरोबरी करु नका’ असे उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
पत्रकार परिषद घेत मुंबईतील न्हावा शेवा सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो का नव्हता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा चष्मा अशाच अँगलकडे जातो. नको तिथे पाहायची त्यांना सवयच लागली आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी देखील त्यांनी अशीच टीका केली होती. अशा बारीक गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि अटलजी चा फोटो का नव्हता? अटलजीचे नातेवाईक का नव्हते? हा उद्धव ठाकरे यांचा बालिशपणा आहे. बालिशपणा हाच शब्द त्यांना लागू होतो. अशा शब्दांत शिरसाट यांनी ठाकरेंना सुनावले.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिरात येण्यासाठी लिहिलेल्या पत्राबाबत शिरसाट यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, काळाराम मंदिरात राष्ट्रपतींना यांच्यामुळे निमंत्रण मिळणार आहे का? राष्ट्रपती थेट येऊ शकत नाहीत का? काळाराम मंदिरांची याची मालकी आहे का? काळाराम मंदिरात तुम्ही किती वर्षांनी जात आहात? मोदी साहेब काळाराम मंदिरात गेले याचंही यांना वावडं आहे. काळाराम मंदिरमध्ये उद्धव ठाकरे यापूर्वी किती वेळा गेले होते, हे त्यांनी सांगावं. तुम्ही मोदी साहेबांची बरोबरी करू नका, असं संजय शिरसाट म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या जागेसाठी जंग पछाडलं आहे. यावरुन शिरसाट यांनी टीका केली असून उद्धव ठाकरे आज 19 वर्षानंतर त्या शिवसेनेच्या शाखेत गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना माणसांत आणण्याचं काम केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची ही पोहचपावती आहे. आता शिवसैनिक जवळ येतात. एकेकाळी आमदारांना जवळ यायला परवानगी नव्हती. हे परिवर्तन झालं त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहे. घराणेशाही वाक्य तुमच्यासाठी लागू होतं, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.