वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली...
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप असलेले आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आले आहेत. वाल्मिक कराड यांनी स्वत: यासंदर्भातला एक व्हिडीओ जारी केला आणि त्यानंतर ते पुण्यात सीआयडीच्या स्वाधीन झाले. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपण निर्दोष असल्याचाही दावा केला आहे.यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी जर स्वतःहून पोलिसांना शरण येत असेल तर पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
Santosh Deshmukh: “वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल होणार नाही कारण याचा बाप…”; आव्हाडांची घणाघाती टीका
‘पोलीस जर आरोपींना पकडू शकत नसतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की, सीडीआरनुसार जे जे आरोपी आढळतील त्यांना सर्वांना अटक करून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. वाल्मिक कराड यांनीही चौकशीअंती दोषी आढळल्यास शिक्षा देण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. आता पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करायला हवा, असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.
संतोष देशमुख यांची बहीण म्हणाली की, ते स्वतःहून शरण आले. पण इतर आरोपींना कधी पडणार? हत्या करणारे तीन आरोपी कुठे गेले? २२ दिवस झाले माझ्या भावाची हत्या होऊन. पण अद्यापही आरोपी फरार आहेत. आम्हाला राजकारणातील काही कळत नाही. माझ्या भावानेही कधी राजकारण केलं नाही. तो समाजसेवा करत होता. माझ्या भावासारख्या देवमाणसाची इतकी निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यात “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हरटं आहे.