
Satara Road Encroachment
Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
खण आळी हा शहरातील महत्त्वाचा बाजारपेठ परिसर आहे. या भागात दुकानांसमोरील लोखंडी फलक, रस्त्याच्या हद्दीत आलेल्या पायऱ्या आणि कट्ट्यांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या जागेवर मर्यादा येत असल्याचे पालिकेच्या पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे केवळ तोंडी सूचना देण्याऐवजी रस्त्याची प्रत्यक्ष मोजणी करून अतिक्रमणांची निश्चित हद्द ठरविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या शहर विकास विभागामार्फत सुरू असलेल्या या प्रक्रियेची सभापती अशोक शेडगे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मोजणीची माहिती घेऊन त्यांनी अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतल्यास अनावश्यक वाद टाळता येतील आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होण्यास मदत होईल, अशी पालिकेची भूमिका आहे.
रस्त्याची हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमणधारकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात संबंधितांनी रस्त्याच्या हद्दीत येणारे फलक, पायऱ्या, कट्टे आणि अन्य अडथळे स्वतःहून हटविणे अपेक्षित आहे. अन्यथा पालिकेला प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल. त्यामुळे व्यापारी या सूचनेला कितपत प्रतिसाद देतात आणि मुदत संपल्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बारटक्के चौक आणि शाहू चौक परिसरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जात आहे. खण आळीतील कारवाई ही शहरातील रस्ते मोकळे करण्याच्या व्यापक मोहिमेची सुरुवात ठरणार का, हे आगामी कार्यवाहीतून स्पष्ट होईल.
“संत नामदेव महाराज पथाची मूळ रुंदी नऊ मीटर आहे. प्रत्यक्ष मोजणी करून रस्त्याची हद्द निश्चित करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या हद्दीत आलेले लोखंडी फलक, पायऱ्या, कट्टे आणि इतर अतिक्रमणे सात दिवसांत स्वतःहून हटवावीत. नागरिकांना वाहतुकीसाठी अडथळा होऊ नये आणि रस्त्याचा वापर सुरळीत करता यावा, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. मुदतीत अतिक्रमणे न हटविल्यास नगरपरिषद नियमानुसार कारवाई करेल,” असे नियोजन व विकास समितीचे सभापती अशोक शेडगे यांनी स्पष्ट केले.