Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व युवा उद्योजक राजू काका भोसले यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. राजू काका भोसले यांच्या पुढाकारातून आणि स्वतःच्या खर्चातून तळीये गावात बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून, रुग्ण व ग्रामस्थांसाठी मोठ्या प्रमाणात बिस्किटांचेही वाटप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, राजू काका भोसले हे सकाळपासूनच तळीये गावात प्रत्यक्ष फिरून परिस्थितीची पाहणी करत आहेत. रुग्ण व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत असून, साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, राजू काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्य जयश्री काकी भोसले यांच्या माध्यमातूनही परिसरातील नागरिकांशी संपर्क आणि परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
गावात मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच साथीचे नेमके कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, तळीये गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून पुढील काळात कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






