पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर
निलंगा : ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचा विकास करण्यावर भर दिला जात असताना, निलंगा शहरातील पेठ भागातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ९७विद्यार्थ्यांना मात्र भाड्याच्या घरात शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या किरायाचा आर्थिक भार कार्यरत शिक्षकांकडून उचलला जात असल्याची माहिती समोर समोर आली आहे. त्यामुळे शाळेला स्वतंत्र इमारत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पेठ येथील ही शाळा १५ जून २०२५ पासून स्थानिक रहिवासी महादेव पटणे यांच्या घरात सुरू आहे. सुमारे १० बाय १० फूट आकाराच्या आठ खोल्यांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. शाळेची इमारत अरुंद बोळात असल्याने पालकांकडूनही चिंता व्यक्त होत आहे. काही पालक आपल्या पाल्यांना या शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा परिणाम विद्यार्थीसंख्येवर होत असल्याची माहिती आहे.
शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ९७ विद्यार्थी असून त्यात ४६ मुले आणि ५१ मुलींचा समावेश आहे. पहिलीमध्ये ९, दुसरीत ९, तिसरीत ११, चौथीत १४, पाचवीत १९, सहावीत २० आणि सातवीत १५ विद्यार्थी आहेत. चार शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक पद रिक्त आहे. या ९७ विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी एकच शौचालय असल्याची माहिती आहे. तसेच शाळेला स्वतंत्र खेळाचे मैदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच स्वच्छता, सुरक्षितता आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा पुरेशा आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेला स्वतंत्र इमारतीची मागणी
स्वतंत्र इमारतीची मागणीभाड्याच्या घरात सुरू असलेली शाळा, अरुंद बोळातील इमारत, स्वतंत्र खेळाचे मैदान नसणे, ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, शिक्षकांचे रिक्त पद आणि किरायाचा शिक्षकांवर पडत असलेला आर्थिक भार या बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पीएम श्री शाळेला स्वतंत्र इमारत, पुरेशी स्वच्छतागृहे, खेळाची जागा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांतून व्यक्त होत आहे.






