राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील आणि संदीप राजोबा उपस्थित होते. या मोर्चाला खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “४२ हजार कोटी रुपयांत होणारा रस्ता एक लाख दहा हजार कोटी रुपयांपर्यंत नेला जात आहे. या प्रकल्पाचा डीपीआर योग्य असल्याचा विश्वास सरकारने किमान आयआयटी किंवा अन्य विश्वासार्ह संस्थेच्या माध्यमातून जनतेला द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
सरकारकडून मोठ्या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. “मोठ्या उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली जातात; मग शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांबाबतही तोच नियम का लावला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला. कर्जमाफीबाबत सरकारने केवळ आकडे न सांगता लाभार्थी शेतकऱ्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली. “पाण्याचे नैसर्गिक प्रवाह आणि नाले अडवले गेले तर नव्या संकटांना सामोरे जावे लागेल. कृष्णा नदीच्या पाणीपातळीवर या रस्त्याचा परिणाम होऊ शकतो. हिप्परगी येथे एक दरवाजा बंद असला तरी सांगलीपर्यंतची जमीन पाण्याखाली जाते. हा रस्ता झाल्यास भविष्यात कराडपर्यंतचा भागही दरवर्षी पूरबाधित होण्याचा धोका आहे,” असा दावा शेट्टी यांनी केला.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, सिंचनाच्या सुविधा निर्माण करून आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने कृष्णा, वारणा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक केली आहे. “अशा जमिनी केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी हातच्या जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांची जमीन घेऊन आम्हाला अशी प्रगती नको,” असे जयंत पाटील म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यायी मार्ग, विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण यांसारखे पर्याय उपलब्ध असताना शेतकऱ्यांच्या शेतातूनच रस्ता काढण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. रस्त्याची लांबी वाढवून सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शक्तीपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघातून जावा यासाठी काही लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी “देवांना जोडण्याऐवजी नेत्यांच्या जमिनी आणि मतदारसंघ जोडण्याचा प्रयत्न होत आहे,” अशी टीका केली.शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विरोध होत असून यापूर्वी कोल्हापूर, पंढरपूरसह विविध ठिकाणी आंदोलने झाल्याचेही त्यांनी सांगितले.
२१ ऑगस्टच्या मोर्चाबाबत जयंत पाटील म्हणाले, “जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. शक्तीपीठसारख्या रस्त्याची आम्हाला गरज नाही, असे शेतकरी आणि जनता सांगत आहे. प्रचंड खर्च करून आधीच चांगल्या दळणवळणाच्या सुविधा असलेल्या भागात नवीन महामार्ग करण्याची आवश्यकता नाही.”
कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय
बी. जी. पाटील यांनी आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले. “जमीन शिल्लक राहिली तरच युवकांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे सुमारे ३ हजार ५२ एकर जमीन बाधित होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करताना पाचपट मोबदला मिळणार असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात रेडीरेकनरच्या दरानुसार मोबदला निश्चित केला जात असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांशी पुरेशी चर्चा न करता प्रकल्प पुढे रेटू नये, अशी मागणी करण्यात आली.
शक्तीपीठ महामार्गासाठी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी जमीन मोजणी केली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. “सरकारने आपली जबाबदारी टाळू नये. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
“कृष्णा, वारणा आणि अन्य नद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी इंच न इंच जमीन सुपीक केली आहे. अनेकांनी कर्ज काढून जमीन सिंचनाखाली आणली. ही जमीन एखाद्या प्रकल्पासाठी गमावली तर पुढच्या पिढीसमोर मोठे संकट उभे राहील.” जयंत पाटील





