
शिराळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित, विधानसभेत संताप
दरम्यान, या घटनेबाबत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले होते. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानवी वस्ती आणि शेतरानात बिबट्याचा वाढता वावर रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली होती.
बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती. गरीब कुटुंबातील बालकाच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र आंदोलन केले होते. या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली होती.
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप
यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेस जबाबदार ठरलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी पारधी यांना निलंबित करण्यात येत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक परवानग्यांबाबत केंद्रीय वन मंत्रालयाशी संपर्क साधला जात असून वन्यजीव विभागाची परवानगी घेतली जाईल.”
पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्याच्या नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रयोग शिराळा परिसरातही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिबट्याला ‘शेड्यूल-१’ मधून ‘शेड्यूल-२’ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.