फोटो - सोशल मीडिया
बुलढाणा : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणूकीपूर्वी पक्षांतर आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्यात सत्तातरांचे राजकीय नाटक रंगल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ती निर्णायक ठरणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अजिक पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरु केली तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे चुरशीचे प्रयत्न सुरु आहे. सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या एका आमदाराने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो?
बुलढाणा जिल्ह्यतील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं वक्तव्य केलं. राजेंद्र शिंगणे हे सध्या अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत. मात्र निवडणूकीपूर्वी त्यांनी अजित पवारांच्या पक्षाबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असे वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी थेट माध्यमांसमोर केले आहे. तसेच आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असे म्हटले आहे.
राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?
माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले,“गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.
पुढे आमदार शिंगणे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असे मतही आमदार राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.