
सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त
मागील काही दिवसांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात सगळीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई केली जात आहे. मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळ आणि केमिकलयुक्त पदार्थांची विक्री केली जात आहे. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचते. ग्राहकांच्या ताटात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत मुंबईतील सहा रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि क्लबचे परवाने निलंबित केले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत राज्यभर धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली असून केवळ मुंबईतच ३१ धाडी टाकण्यात आल्या.(फोटो सौजन्य – istock)
या कारवाईदरम्यान तब्बल ३४ लाख ८७हजार ६०३ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, गुटखा आणि इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पदार्थांची विक्री, वाहतूक आणि वितरण करणाऱ्या १९ जणांना अटक करण्यात आली असून एक आस्थापना सील आणि तीन वाहने जप्त करण्यात आली.परवाना निलंबित करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये नारिमन पॉइंट येथील फ्लिंट अँड वारसा, बोरीवलीतील एम. के. बेकरी, भांडुपमधील सुजीत बार अँड रेस्टॉरंट, सांताक्रूझमधील हॉटेल गोपाल कृष्णा, अंधेरीतील कराक एंटरप्रायझेस आणि वांद्रे येथील मद्रास डायरीज यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान चुकीचे ब्रेंडिंग, मुदतबाह्य अन्नपदार्थ, अत्यंत अस्वच्छ स्वयंपाकगृहे, उंदरांचा व झुरळांचा वावर, निकृष्ट रेफ्रिजरेशन व्यवस्था, कामगारांची वैद्यकीय तपासणी न करणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव तसेच अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. काही ठिकाणी चुकीच्या लेबलिंगमुळे अन्नसाठाही जप्त करण्यात आला.
‘बनावट, विनापरवाना, दिशाभूल करणारी किंवा सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील,’ असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास एफओएससीओएस पोर्टल, फूड सेफली कनेक्ट अॅप किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.