सोलापूर दूध संघ भ्रष्टाचार प्रकरण; अभिजीत पाटील विधानसभेत चौकशीची मागणी
पंढरपूर : राज्य दूध महासंघात ज्याप्रमाणे आर्थिक गैरव्यवहार कऱण्यात आल्याचे उघड झाले. ज्या अधिकाऱ्यांनी हा अपहार केला ते निलंबितझाले का, त्यांच्यावर कारवाई झाली का,असा सवाल आमदार अभिजीत पाटील यांनी काल विधानसभेत उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी त्यानंतर सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातही अशाच पद्धतीचे आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केले, यामुळे सोलापुरातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य दूध उत्पादक महासंघाप्रमाणेच सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले आहेत, या गैरव्यवहारांची चौकशी झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. परंतु, मंत्रालयात पोहोचल्यानंतर शहाजी पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही चौकशी रद्द करत संचालक मंडळ पुन्हा पूर्ववत केले. अशा प्रकारांना आपण अजून किती दिवस अभय देणार, असा प्रश्न अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचार होतोय, तो सिद्धही होत आहे.चौकशी होतेय, पण पुन्हा दूध संघाचं संचालक मंडळ दोषी आढळले असतानाही पुन्हा तेच संचालक मंडळ स्थापन केले जाते, हे प्रकार कधी थांबणार असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दोषींना निलंबित का करण्यात आले नाही? मंत्रालयातूनच चौकशी का रद्द करण्यात आली? भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतरही संचालक मंडळ पूर्ववत का केले? अशा प्रकारांना अभय देण्याचा शासनाचा हेतू काय? “दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेच्या पैशांचा अपहार करणाऱ्यांना अभय देणं म्हणजे अन्यायाला पाठबळ देणं होय. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू, आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल,” असा इशाराही आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला.
सोलापूर जिल्हा दूध संघ भ्रष्टाचार प्रकरण म्हणजे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये (Solapur District Milk Union) झालेला कथित आर्थिक गैरव्यवहार. यात संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची वेळ आली, कारण संघाला मोठा तोटा झाला होता आणि संचालक मंडळाने यावर योग्य लक्ष दिले नाही, असे आरोप आहेत.
मागील काही वर्षांपासून सोलापूर जिल्हा दूध संघ तोट्यात चालला होता. पण दूध संघाला या तोट्यातून बाहेर काढण्यात संचालक मंडळ अपयशी ठरले. त्यामुळे संघावरील कर्जाचा बोजा वाढला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम ७८(अ) नुसार, विभागीय उपनिबंधकांनी संचालक मंडळाला बरखास्त करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
संघाच्या कारभारात अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत. काही ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे, जसे की मंगळवेढा येथील संकलन केंद्रावर बोगस दूध संकलन करून गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक म्हणाले की, दूध संघात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही. जर भ्रष्टाचार झाला असेल, तर ते सार्वजनिक जीवनातून निवृत्त होतील. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. काही माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अखेर, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आणि प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले.