
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा (फोटो सौजन्य- Chatgpt)
एसटीने सवलत मूल्याची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आणि दिवाळी भेटीची रक्कम देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम ३ नोव्हेंबरपर्यंत न मिळाल्यास ४ नोव्हेंबर रोजी हे निषेध आंदोलन करण्यात येईल, असे बरगे यांनी सांगितले.
एसटीने सरकारकडे निधीची मागणी केल्यानंतर अर्थ खात्याकडून वारंवार त्यात मिठाचा खडा टाकला जात असल्याचा आरोप बरगे यांनी केला. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी खारट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठविण्यात येईल, असे ते म्हणाले.
एसटीने सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि थकीत देणी भागविण्यासाठी सरकारकडे १,०१५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारने केवळ ३८०.०६ कोटी रुपये दिल्याने महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढतील, असा दावा त्यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांतील ५,७४० कोटी रुपयांहून अधिक देणी थकीत आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि उपदानाची (ग्रॅच्युइटी) सुमारे ३,३५० कोटी रुपयांची रक्कम संबंधित ट्रस्टकडे जमा करण्यात आलेली नाही, असे बरगे यांनी सांगितले.
ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांतील सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांची जवळपास ७५ कोटी रुपयांची पीएफ आगाऊ रक्कमही प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. कर्मचाऱ्यांचा वाढीव महागाई भत्ता आणि वेतनवाढीच्या फरकापोटी५७४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम देणे बाकी असल्याचा दावाही त्यांनी केला. अलीकडील वेतनवाढीच्या फरकापोटी सरकारने ५३८.८३ कोटी रुपये फक्त कागदावर मंजूर केले असले, तरी ही रक्कम एसटीला अद्याप मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
एसटीचा संचित तोटा वाढत असून अपेक्षित प्रवासी उत्पन्न मिळत नाही. त्यातच कर्मचारी देणी, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि अन्य देयकांची थकबाकी वाढत असल्याने महामंडळाला दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळणे कठीण होत आहे, असे बरगे म्हणाले. कर्मचाऱ्यांची देणी थकल्याने त्यांच्यात नाराजी वाढली असून औद्योगिक अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही कर्मचारी संघटनांनी आंदोलनाच्या नोटिसाही दिल्या आहेत, असा दावाही बरगे यांनी केला आहे.
Ans: एसटी महामंडळाला आवश्यक निधी न दिल्यास मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
Ans: एसटी महामंडळाच्या निधीचा प्रश्न आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत सरकारने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी संघटनेने हा इशारा दिला आहे.
Ans: एसटी महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, हे अधिकृत निर्णयानंतर स्पष्ट होईल.