मुंबई: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाजजागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर देवस्थान येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही स्थळांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन, आठ दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नमूद केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्रांशी संबंधित प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार संजय बनसोडे, आमदार राजेश वानखेडे, आमदार संजय खोडके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव डॉ. मनिषा वर्मा, अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), तसेच श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाचे प्रतिनिधी जनार्दन बोथे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीनही तीर्थक्षेत्रांतील विकासकामांचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार करून आठ दिवसांत शासनास सादर करा. ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. तसेच, या स्थळांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी. या स्थळांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, ता. तिवसा, जि. अमरावती यांच्याकडे सोपवण्यात येईल. जबाबदारी हस्तांतरित करताना संबंधित संस्थेचा उत्पन्नाचा स्रोत, व्यवस्थापन क्षमता आणि देखभाल कौशल्यांसंदर्भात सविस्तर विचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
पुणे महानगर क्षेत्र होणार ग्रोथ हब…; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला नीती आयोगाचा ‘मास्टरप्लॅन’
अजित पवारांनी सांगितला नीती आयोगाचा ‘मास्टरप्लॅन’
पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंत्रालयात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता उपस्थित होते.