राजेगाव : आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे बांधताना तसेच आपल्या हातात पाठ्यपुस्तकाच्या ऐवजी कोयते घेताना दिसत आहेत. शिक्षणाचे धडे गिरवण्यापेक्षा हि मुले काम करण्यातच धन्यता मानत असल्याची सध्यस्थिती आहे.
ऊस तोडणीसाठी परगावाहून आलेल्या या मुलांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण तर शिक्षण आणि बाकी सुख सुविधा मिळणे दुर्मिळच. दौंड तालुक्यात उस तोडणीसाठी जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून हे ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही राजेगावसह परिसरात या कामगारांच्या झोपड्या थाटलेल्या आहेत. यंदा या भागात ऊस तोडणीसाठी अनेक कारखान्यांचे मजूर आले असून, या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबही दाखल झाले आहे.
अज्ञानामुळे नाही हक्कांची जाणीव
या मजुरांचे आणि शिक्षणाचे काही देणेघेणे नाही. शाळेत जाण्याचा सबंध न आल्याने या समाजातील मुलांना आणि नागरिकांना आजही आपल्या हक्कांची पूर्ण जाणीव नाही. यामुळे आजही या समाजातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. खरे पाहता या समाजातील लोकांनाही शिक्षणाचे महत्व पटू लागले आहे. मात्र, शिक्षणाचा अभाव, घरातील अठराविश्व दारिद्र, यामुळे अनेक छोटे हात हातात कोयता घेवून उस तोडणीचे कार्य करत आहेत.
शिक्षणासाठी दाखले मिळणे अवघड
या ऊस तोड मजुरांची काही मुले शिक्षण घेत असली तरी शासकीय सुविधा मिळवण्यासाठी शासन दरबारी विविध दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण विभागाने जागरूक राहणे गरजेचे आहे. या बाल कामगारांना शिक्षण देण्याचे कार्य करणे गरजेचे आहे.
सर्व शिक्षा अभियानाची ऐशी कि तैशी
केंद्र सरकारने शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियान संपूर्ण महाराष्ट्राभर राबवले. प्रत्यक्षात मात्र या अभियानाचा बाल कामगार, ऊस तोडणी मजूर तसेच अनुसूचित जाती जमातीतील मुलांना पुरेपूर फायदा होतो कि नाही हे पाहणे देखील महत्वाचे आहे. शिक्षणापासून वंचित असलेली मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी देखील महत्वाची ठरते.
[blockquote content=”गेली दहा वर्षांपासून मी व माझी पत्नी ऊस तोडणीचार काम करत आहे. आमचा उदरनिर्वाह या कामावर आहे माझ्या वडिलांनीही हेच काम केले आणि मीही आता हेच काम करत आहे. मात्र, आमच्या मुलांनी हे काम करू नये यासाठी सरकारने आमच्या मुलांसाठी शिक्षणाची आणि छोटे मोठे व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला तर आमची पुढची पिढी या व्यवसातून बाहेर पडेल हीच आमची सरकार मायबापला विनंती.” pic=”” name=”- ऊस कामगार -अरुण कांबळे, अमरावती.”]