
Gopichand Padalkar, Sangli District Bank, Supreme Court,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकरांना दिलासा
जत ‘अ’ सोसायटी गटातून दाखल केलेला पडळकरांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ठरवला वैध.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने त्यांचा अर्ज अवैध ठरवला
Sangali News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरविलेला पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. त्यामुळे जत ‘अ’ सोसायटी गटातून त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत ‘अ’ सोसायटी गटातून सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपांवरून त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या निर्णयाविरोधात पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाजूने अॅड. मुकुल रोहतगी आणि अॅड. आनंद लोंढे यांनी युक्तिवाद केला. तर विक्रमसिंह सावंत यांच्या बाजूने अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले. त्यांचे कार्यकर्ते महादेव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, विरोधकांनी उच्च न्यायालयात जाऊन त्यांच्या उमेदवारीला स्थगिती मिळवली होती. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आता न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागल्याने आमदार गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवू शकतील.
Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५
गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला कायदेशीर वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशा परिस्थितीत पडळकर यांच्या उमेदवारीचा पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, याकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
“सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. देवाभाऊ नेहमीच माझ्या पडत्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भावना अतिशय तीव्र झाली होती. माझा अर्ज राहणार की नाही, याबाबत त्यांना चिंता होती. कारण जिल्हा बँकेत प्रस्थापितांच्या विरोधात मी आवाज बनून जाणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी मान राखावा. माझ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शांततेने काम करावे. संयम राखून निवडणुकीला सामोरे जावे.”
-आ.गोपीचंद पडळकर