
राजकारणावर कौटुंबिक सलोखा भारी; बारामतीच्या कृषीप्रदर्शनात सुप्रिया सुळे–सुनेत्रा पवार एकत्र
कृषी प्रदर्शनाची पाहणी या दोघींनी इलेक्ट्रिक कारमधून एकत्र केली. त्यांच्यासोबत डॉ. रजनी इंदुलकर देखील होत्या. आधुनिक शेती, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध दालनांची पाहणी करताना दोघीही संवाद साधताना आणि आनंदी वातावरणात दिसून आल्या. उपस्थित नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनीही या दृश्याकडे विशेष कुतूहलाने पाहिले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील राजकीय मतभेद उघडपणे समोर आले होते. मात्र “राजकारण आणि कौटुंबिक नाते यामध्ये आम्ही नेहमीच स्पष्ट फरक ठेवतो,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केले आहे. कृषी प्रदर्शनात दिसलेले दृश्य त्यांच्या या भूमिकेचे जिवंत उदाहरण ठरले.
दोन्ही गटांतील नेत्यांची बंद दाराआड चर्चा
याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार तसेच पुतणे युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळीही राजकीय मतभेद बाजूला ठेवून नातेसंबंध जपले जात असल्याचे स्पष्ट झाले होते. आता पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात दोघींची एकत्रित उपस्थिती दिसल्याने हा संदेश अधिक ठळकपणे पुढे आला. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर कृषी प्रदर्शनात पवार कुटुंबीयांची उपस्थिती दिसल्याने, या घटनेकडे राजकीय अंगानेही पाहिले जात आहे.
राजकारणापलीकडे मानवी नात्यांचे महत्त्व
एकीकडे राजकीय संघर्ष आणि पक्षीय मतभेद सुरू असतानाच, दुसरीकडे नणंद–भावजय म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचे सौहार्दपूर्ण आणि आनंदीपणे एकत्र दिसणे, हे पवार कुटुंबाच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ठरले. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात उमटलेली ही छबी, राजकारणापलीकडे मानवी नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे.