"...संजय राऊत यांच्यावर कारवाई करा", शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)
मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली. शिवसेनेच्या वतीने तशी मागणी करणारे निवेदन त्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराची चित्रफित प्रसारित करून देशातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी प्रक्षोभक वक्तव्ये करून संजय राऊत यांनी अराजक निर्माण करण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत.त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट चिथावणीखोर तर आहेच पण त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लोकशाही मार्गाने आपण विजय मिळवू शकत नाही त्यामुळे अशी वक्तव्ये करून समाजात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे या लोकशाहितील चारही स्तंभांवर अविश्वास व्यक्त करून अराजक माजवण्याचे त्यांचे प्रयत्न यापूर्वीही उघड झाले आहेत. नेपाळमध्ये झाली तशीच हिंसा भारतात होऊ शकते असे म्हणून देशात हिंसाचार घडवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या या चिथावणीखोर वक्तव्याची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना खासदार मिलिंद देवरा, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार तुकाराम काते, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रा.ज्योती वाघमारे, संजना घाडी, माजी नगरसेविका सुशिबेन शहा, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, आशा मामेडी हे उपस्थित होते.
संजय राऊत सारखी व्यक्ती जे बोलते त्यामुळे शहरात बॉम्बच्या अफवा पसरणे, धमकीचे कॉल येणे असे प्रकार घडू शकतात त्यामुळे पोलीसांनी राऊत यांची चौकशी करणे आवश्यक आहे. राऊत पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आहेत. राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत. राऊत सातत्याने सोशल मिडियावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, देशाविरोधी गरळ ओकतात, त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त देवेन भारती संजय राऊतांवर कारवाई करणार का? त्यांना समज देणार की गुन्हा दाखल करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.