तासवडे MIDC मध्ये भीतीचे वातावरण कायम; SKM फाईन केमिकल कंपनीत पुन्हा स्फोटाचा धोका
उंब्रज : तासवडे एमआयडीसीतील एस.के.एम फाईन केमिकल कंपनीतील स्फोटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. सोमवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर मंगळवारी दुपारी केमिकलचा एक कॅन फुटल्याची घटना घडली. सुदैवाने त्याचा मोठा परिणाम झाला नाही, मात्र कंपनीत अजूनही बॅरेल फुटण्याचा धोका कायम असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
सोमवारी रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटाने संपूर्ण एमआयडीसी हादरून गेली होती. त्यानंतर मध्यरात्री १२ च्या सुमारास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मॉनिटरिंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाली असून सध्या सतत निरीक्षण सुरू आहे. या घटनेनंतर तळबीड पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, स्फोटानंतर निर्माण झालेल्या रासायनिक धुरामुळे अनेक नागरिकांना डोळ्यांची जळजळ, अंगाला खाज सुटणे अशा तक्रारी जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कंपन्यांनी खबरदारी म्हणून कामगारांना सुट्टी दिली आहे.
प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कराड विभागातील अधिकारी अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या मॉनिटरिंग सुरू असून पुढील २४ तासांत याचा सविस्तर अहवाल प्राप्त होईल. त्यानंतरच या स्फोटांचा पर्यावरण व नागरिकांवर नेमका किती परिणाम झाला आहे, हे स्पष्ट होईल.” या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर तब्बल आठ ते दहा स्फोटांची मालिका सुरू झाली होती. या स्फोटांचा आवाज तब्बल दहा किलोमीटर परिसरात ऐकू गेला. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असली तरी रात्री पुन्हा झालेल्या मोठ्या स्फोटामुळे भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले.
स्फोटांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून वातावरण दूषित झाले आहे. धुराचे लोट आणि रासायनिक वायूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी रात्री उशिरा मॉनिटरिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर या दुर्घटनेचा नेमका परिणाम स्पष्ट होणार आहे.
एस.के.एम फाईन केमिकल कंपनीत आणखी स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेता विशेष तज्ञ अग्निशामक पथक पाठवण्याची मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे याबाबत पत्रव्यवहार सुरू असून तळबीड पोलिसांनी सातारा औद्योगिक विभागाशी संपर्क साधला आहे. यापूर्वी तारापूर व लोटे-परशुराम येथील केमिकल स्फोटांमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या तज्ञ अधिकाऱ्यांना येथे पाठवावे, अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी केली आहे.






