सौजन्य - नवराष्ट्र टीम
रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश डोंबे, अपक्ष विजयी नगरसेवक तानाजी खोमणे, ग्रामस्थ मानकरी अमोल शिंदे यांनी जेजुरी रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करत भाविक, प्रवासी व पर्यटकांशी संवाद साधला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांना निवेदन देत जेजुरी रेल्वे स्थानक सर्व सोयीसुविधांनी युक्त करावे व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा, अशी ठाम मागणी केली. जेजुरी हे केवळ तीर्थक्षेत्र नगरी नसून, औद्योगिक वसाहत, नियोजित आयटी क्षेत्र, प्रस्तावित विमानतळ व मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील महत्वाचे केंद्र ठरत आहे. तसेच वाढत्या भाविक व पर्यटकांच्या ओघाच्या तुलनेत जेजुरी रेल्वे स्थानकाचा विकास अपुरा असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
स्थानकावरील प्रतीक्षा कक्ष बहुतांश वेळा बंद अवस्थेत असतो. स्वच्छतागृहांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची अडचण व अस्वच्छ परिसर याबाबत मुंबईहून आलेल्या महिला भाविकांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून रेल्वेचे झपाट्याने आधुनिकीकरण सुरू असताना जेजुरी रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत समावेश न होणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही सांगण्यात आले. जेजुरीत दरवर्षी आठ ते नऊ यात्रा भरतात. या काळात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. मात्र महालक्ष्मी, सह्याद्री, गोवा–हुबळी, गुजरात–राजस्थान मार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना जेजुरी येथे थांबा नाही. त्यामुळे भाविक, पर्यटक, उद्योजक व कामगार वर्गाला पुणे, सातारा किंवा कराड येथे उतरून प्रवास करावा लागतो, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
जेजुरी रेल्वे स्थानकापासून जवळच मोरगाव, नारायणपूर, भुलेश्वर, पांडेश्वर, वीर म्हस्कोबा, सासवड येथील शिवमंदिरे, बालाजी मंदिर व किल्ले पुरंदर ही प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळे असून, ती सध्या अधिक विकसित होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता जेजुरी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले. या मागणीसाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विजय खोमणे यांनी दिली.
जागतिक ओळख मिळवणारे लोकोत्सवाचे केंद्र
वास्तविक पाहता जेजुरीची सोमवती यात्रा, विजयादशमी उत्सव यांसारखे भव्य यात्रा–उत्सव केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि परदेशातही प्रसिद्ध आहेत. लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येथे येत असून, कुलधर्म-कुलाचार, पारंपरिक संस्कृती व लोकोत्सवाचा अद्वितीय संगम अनुभवतात. विशेषतः भंडाऱ्याच्या प्रचंड उधळणीमुळे पिवळ्या भंडाऱ्यात न्हालेल्या जेजुरीची क्षणचित्रे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली आहेत. मंदिर व गड परिसर हा लोकोत्सवाबरोबरच विशेष आकर्षण ठरला असून, दर्शनासोबत इतिहास, संस्कृती व निसर्गाचा संगम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे जेजुरीचा विकास केवळ धार्मिक-आध्यात्मिक मर्यादेत न राहता सामाजिक, सांस्कृतिक व आधुनिक दिशेने होत आहे.






