प्रो कबड्डी लीग स्पर्धेत रोमांचक सामन्यात तेलुगु टायटन्सने गुजरात जायंट्सवर मिळवला धमाकेदार विजय
पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पूर्वार्धातील सात गुणांची पिछाडी भरून काढत तेलुगु टायटन्सचा गुजरात जाएंट्स संघावर ३६-३२ असा सनसनाटी विजय नोंदवत आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वार्धात गुजरातने सात गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत तेलुगू टायटन्स संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांमध्ये दहा सामने जिंकले होते. मात्र, अलीकडेच त्यांना येथील मैदानावर जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
सुरुवातील गुजरात पुढे होती
तेलुगु संघाच्या तुलनेमध्ये गुजरात संघाची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या १८ सामन्यांपैकी केवळ पाचच सामने जिंकले आहेत. तरीपण शेवटपर्यंत जिद्दीने लढत देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याविषयी कमालीची उत्सुकता होती.
मध्यंतरापर्यंत गुजरातची आघाडी
सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला होता. त्यामुळेच दहाव्या मिनिटापर्यंत सतत बरोबरीच दिसून येत होते. सामन्याच्या पंधराव्या मिनिटाला गुजरात संघाने १०-७ अशी आघाडी मिळविली. मध्यंतरास दीड मिनिटे बाकी असताना त्यांनी पहिला लोण नोंदविला आणि १५-९ अशी आघाडी मिळविली. मध्यंतराला त्यांच्याकडे १८-११ अशी आघाडी होती.
उत्तरार्धातही गुजरात संघाने आघाडी राखण्यासाठी सातत्याने नियोजनबद्ध खेळ केला. तेलुगु संघानेही उत्तरार्धात पिछाडी भरून काढण्यासाठी जिद्दीने खेळ केला. शेवटची सात मिनिटे बाकी असताना त्यांनी दोन गुणांची आघाडी मिळवित सामन्यास कलाटणी दिली. पाच मिनिटे बाकी असताना त्यांनी ३०-२६ अशी आघाडी घेतली. दीड मिनिट बाकी असताना त्यांनी लोण चढवीत आपली आघाडी बळकट केली
गुजरात संघाचा कर्णधार गुमान सिंग व राकेश यांनी अतिशय प्रभावी चढाया केल्या. त्यांच्या नीरजकुमार याने पकडीत २०० गुणांचा टप्पा ओलांडला.तेलुगु संघाकडून विजय मलिक व आशिष नरवाल यांनी खोलवर चढाया केल्या. त्यांच्या पवन सेहरावत चढाई मध्ये गुणांचे शतक साजरे केले.