कल्याण ग्रामीण : आज स्वच्छता अभियान राबवला जात आहे, मात्र भंडार्ली डम्पिंग ग्राउंड आश्वासन देऊन देखील बंद होत नाही. आमच्या समाजावर कचरा आणून टाकायचे आहे का? मुख्यमंत्री आणि खासदार दोघे कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. डम्पिंग ग्राउंड समोर १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. डम्पिंगला जाणाऱ्या सर्व कचरा गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत या गाड्या थांबून ठेवणार. आता हे आंदोलन करतो आहे. पुढे गाड्या थांबवायच्या की गाड्या जाळायच्या हे ठरवणार असा राजू पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या भंडार्ली डम्पिंग ग्राउंड स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हे डम्पिंग ग्राउंड तात्पुरते सुरू करण्यात आले होते, हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाईल असे स्थानिक नागरिकांना सांगितले गेले होते. परंतु डम्पिंग ग्राउंड बंद केले नाही. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. एवढेच नाही तर महापालिका आयुक्तांना भेटून हा प्रश्न लवकरच मार्गी लावा यासाठी मुदत देखील दिली होती. पहिली डेडलाईन फेब्रुवारी महिन्याची होती. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले होते की ३० सप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद करणार ही डेडलाईन देखील पाळली गेली नाही.
आज १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसे आमदार राजू पाटील हे आक्रमक झाले आहेत. डम्पिंग ग्राउंडचा मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. कचरा टाकणाऱ्या कचऱ्याच्या सर्व गाड्या रस्त्यावर रोखून धरल्या आहेत. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले, खरंतर डेड लाईन आम्हाला फेब्रुवारी महिन्याची दिली होती. त्यांनी आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही त्यांना १५ ते ३० सप्टेंबर ची वेळ दिली होती. त्यानंतरही इथले डम्पिंग ग्राउंड बंद झाले नाही. त्यामुळे आज कचऱ्याच्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत मुख्यमंत्र्यांसाठी ही नामुष्कीची बाब आहे. सर्व स्वच्छता अभियान सगळीकडे चालू आहे तुम्ही तुमचा कचरा आमच्याकडे आणून टाकतात. आम्हाला वाऱ्यावर टाकले आहे का इथली लोक जनावरे आहेत का?
दुसरीकडचा कचरा साफ करणार आणि इथे टाकणार त्यांचे सुपुत्र इथे खासदार आहेत. त्यांना काहीच पडलेली नाही. तिकडे अंबरनाथचा कचरा करवले गावात आणून टाकला जात आहे, म्हणजे आमचा जो समाज आहे त्याच्यावरच कचरा आणून टाकायचा आहे का? यांना कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी पिता-पुत्र दोन्ही अपयशी ठरले. खेदाने बोलावेसे वाटते. सध्या ते गडबडीत असतात त्यांच्याकडे वेळ नसेल मात्र दुसऱ्यांनी तरी पाहिले पाहिजे. त्यामुळे आम्ही हा पावित्र्य घेणार आहोत, की डम्पिंग ग्राउंड बंद करणे संदर्भात लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन आम्ही बंद करणार नाही. अन्यथा आम्ही गाड्या येऊ देणार नाही आणि गाड्या आल्या तर त्या जाळून टाकू. असा इशारा मनसे आमदार यांनी प्रशासनाला दिला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिकेला इशारा दिल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त तुषार पवार आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. डम्पिंग ग्राउंड बंद करण्यामागे काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात येतील. २० ऑक्टोबर पर्यंत हे डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त तुषार पवार यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकाचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी देखील पोहोचले होते .