
Dombivli nandi festival
Dombivli News : साहित्यनगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत ११वे नांदी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उपस्थित होते. संमेलनाला डोंबिवलीतील साहित्यप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यंदाच्या नांदी संमेलनात ‘माहिती तंत्रज्ञान, AI आणि साहित्य’ या विषयावर चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. AI मुळे दैनंदिन जीवनात होत असलेले बदल, नव्या करिअरच्या संधी आणि बदलतं रोजगारविश्व यावर मान्यवरांनी आपली मतं मांडली. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि आव्हानांवरही यावेळी चर्चा झाली.
AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात मराठी भाषा आणि साहित्याचं स्थान काय असेल, यावरही परिसंवादात मंथन करण्यात आलं. नव्या पिढीला तंत्रज्ञानासोबत मराठी भाषा आणि साहित्याशी जोडण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला जोडणारा संवादमंच म्हणून या संमेलनाकडे पाहण्यात आलं.
यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेच्या महत्त्वावर भाष्य केलं. ‘मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान आहे. हे संमेलन म्हणजे साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला जोडणारा संवादमंच आहे,’ असं रविंद्र चव्हाण म्हणाले.
या संमेलनाला समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, साहित्यिक अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा. डॉ. विनय भोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले तसेच साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संमेलनाला उपस्थिती लावली. डोंबिवलीकर रसिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.