
तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश
बुधवारी ठेकेदार संघटनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. कालिदास कदम, विजय भोसले आणि दर्शन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदार आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शासन आणि महापालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रलंबित बिलांचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासन देऊन प्रश्न प्रलंबित ठेवला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. विकासकामे पूर्ण करूनही वेळेत पैसे मिळत नसल्याने आर्थिक नियोजन कोलमडल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
बिले थकल्याने बँकांचे कर्ज फेडणे, कामगारांचे वेतन देणे, बांधकाम साहित्य पुरवठादारांची देणी चुकती करणे आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मोठी रक्कम अडकल्यामुळे अनेक ठेकेदार आर्थिक संकटात सापडल्याचा दावा करण्यात आला.
आंदोलनादरम्यान ठेकेदारांनी शासन आणि प्रशासनाला भावनिक आवाहन केले. “गेल्या तीन वर्षांपासून आम्ही आमच्या हक्काच्या पैशांसाठी पाठपुरावा करत आहोत. वारंवार आश्वासने देऊन आमची बोळवण केली जात आहे. आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका,” अशी भावना ठेकेदारांनी व्यक्त केली.
शासनाने आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून प्रलंबित देयके निकाली काढावीत, अशी ठेकेदार संघटनेची प्रमुख मागणी आहे. रखडलेली बिले लवकर अदा न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश