१२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
कल्याण ग्रामीणमधील २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर या गावांमधील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा प्रश्न निर्माण झाला होता. गावांचा महापालिकेत समावेश झाला, मात्र तेथील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्यात आला नव्हता.
महापालिका सेवेत समावेश व्हावा यासाठी संबंधित कर्मचारी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत होते. दीर्घकाळ प्रश्न प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर या मागणीला आता यश मिळाले आहे. या प्रश्नासाठी शिवसेना गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महापालिका प्रशासन तसेच संबंधित स्तरावर त्यांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला. ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत २७ गावांतील संबंधित कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १२ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यानंतर निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महापालिका सेवेत समावेशाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
निर्णयानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचा सत्कार करून आभार मानले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो महासभेपर्यंत नेल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. २७ गावांचा केडीएमसीमध्ये समावेश झाल्यानंतर निर्माण झालेल्या विविध प्रशासकीय प्रश्नांपैकी कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात होता. आता महासभेच्या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे.
गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल






