
डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल; 48 तासांचा अल्टिमेटम
KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मधील कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये झाली. टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरात गेल्या सात-आठ दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
या भागातील साफसफाईचे काम सुमित एलको कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. मात्र कंपनीकडून अपेक्षित पद्धतीने काम होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि भाजप नगरसेवकांनी केला. सफाई कर्मचारी गणवेशात नसणे, कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन न करणे, कोणत्या कर्मचाऱ्याकडे कोणत्या परिसराची जबाबदारी आहे याबाबत स्पष्टता नसणे, तसेच कचरा वेळेवर न उचलणे अशा विविध तक्रारी समोर आल्या.
Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या विनंतीनंतर उपायुक्त डॉ. कोकरे यांनी प्रभागात अचानक पाहणी केली. जवळपास दीड ते दोन तास त्यांनी विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी कचरा साफसफाई आणि वर्गीकरणासाठी कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून कंपनीच्या व्यवस्थापकासोबत चर्चा करण्यात आली.
पाहणीनंतर सुमित एलको कंपनीला कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून कामकाज सुधारण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला. प्रभागातील कचरा नियमित उचलणे, सफाई कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करणे आणि स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, भाजप नगरसेवकांनी सुमित एलको कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचे काम केले जात असताना परिस्थिती अधिक चांगली होती. खासगी कंपनीकडे काम गेल्यानंतर कचरा साचण्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काही सोसायट्यांमध्ये कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे रहिवाशांना तो काही काळ घरातच ठेवण्याच्या सूचना द्याव्या लागत असल्याचेही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
सुमित एलकोचे कंत्राट बंद करून पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्था राबवावी, अशी मागणी प्रभागातील भाजप नगरसेवकांनी केली असून हा मुद्दा आगामी महासभेतही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”