मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; नेस्ले इंडियाने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण
कल्याण परिसरातून मॅगी नूडल्सबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका ग्राहकाने मॅगीचं पाकीट तयार करताना त्यामध्ये किडे आणि अळ्या आढळल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर पॅकेज्ड फूडच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता यावर नेस्ले इंडियाकडून (Nestle India) स्पष्टीकरण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहक मॅगी नूडल्स बनवत असताना त्यामध्ये किडे आणि अळ्या दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित पाकिटावर फेब्रुवारी 2027 अशी एक्सपायरी डेट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उत्पादनाची मुदत संपलेली नसतानाही असा प्रकार कसा घडला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या कथित प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने याची दखल घ्यावी आणि संबंधित उत्पादनाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणावर नेस्ले इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, या प्रकरणाची माहिती कंपनीला माध्यमांमधून मिळाली असून अद्याप संबंधित ग्राहक किंवा अधिकाऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे सध्या या तक्रारीच्या सत्यतेबाबत भाष्य करता येणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
कंपनीने पुढे सांगितलं की, कच्च्या मालाच्या खरेदीपासून उत्पादन आणि पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अनेक गुणवत्ता तपासण्या केल्या जातात. उत्पादन प्रक्रिया लागू असलेल्या गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार केली जाते, असंही नेस्ले इंडियाने म्हटलं आहे.
तसंच, आपल्या उत्पादन केंद्रांमध्ये गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा व्यवस्थापनाची मजबूत यंत्रणा असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि उच्च दर्जाची उत्पादनं देण्याची आपली बांधिलकी कायम असल्याचंही नेस्ले इंडियाने म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणातील ग्राहकाचा दावा अधिकृत तपासणीत सिद्ध झालेला नाही. त्यामुळे संबंधित उत्पादनाचा नमुना तपासल्यानंतरच कथित दूषितपणाबाबत निश्चित निष्कर्ष समोर येऊ शकतो.
Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?






