Mira Bhayandar महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध; दोन नावांवर आक्षेप
दरम्यान, महापालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलसाठी ‘माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभागृह’ आणि ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ अशी दोन नावे प्रस्तावित असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. यापैकी सभागृहाला स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे.
सर्वाधिक आक्षेप अ.क्र. १८ मधील प्रस्तावावर घेण्यात आला आहे. मिरारोड पूर्वेकडील एका चौकाला ‘शांतीस्टार बिल्डर्स श्री. असित रमेश शाह चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा समितीने केला आहे. सार्वजनिक रस्ते आणि चौकांना खासगी विकासक अथवा व्यावसायिक व्यक्तींची नावे देणे चुकीचे असून, यामुळे भविष्यात चुकीचा पायंडा पडू शकतो, असे समितीने म्हटले आहे.
सार्वजनिक मालमत्तांच्या नामकरणात स्थानिक इतिहास, भूमिपुत्र, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, खेळाडू, कवी, लेखक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जेपी परिसरातील मार्ग किंवा चौकाला हुतात्मा राजगुरू यांचे नाव देण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आल्याची आठवणही समितीने करून दिली आहे.
या हरकतींची दखल घेऊन संबंधित प्रस्ताव महासभेत नामंजूर करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष करून इतर राज्यांतील व्यक्ती, इतर संस्कृती किंवा खासगी विकासकांची नावे सार्वजनिक ठिकाणांना देण्यात आल्यास मराठी एकीकरण समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.





