
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
या प्रकरणात तक्रारदार महिलेने आपल्या पतीच्या तीन नातेवाईकांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. संबंधित व्यक्तींनी घरात घुसून धक्काबुक्की, शिवीगाळ तसेच घर पाडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. याच घटनेदरम्यान अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलीशी संबंधित आरोप असूनही सुरुवातीला POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. तसेच आरोपींना पोलिसांकडून मदत केली जात असल्याचा आरोप करत तिने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर तक्रारदार महिलेने पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि DCP राहुल चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरोधात POCSOसह योग्य त्या कायदेशीर कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर तसेच पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि DCP राहुल चव्हाण यांच्या निर्देशानुसार अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात तक्रारदार महिलेने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर पोलिसांकडून झालेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
तक्रारीनुसार, शहानवाज असरार खान, अदनान खान आणि आफा खान यांच्यावर घरात घुसून महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यापैकी शहानवाज असरार खान याच्याविरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. त्याच्याविरोधात तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात आला होता.
घटनेदरम्यान महिलेचा अल्पवयीन मुलगा मध्ये आला असता त्यालाही उचलून बाजूला फेकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून आता अधिक तपासणी केली जात आहे.
POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपांची सत्यता, उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे पुढील तपासात नेमकी कोणती कारवाई होते आणि आरोपींविरोधात कोणते पुरावे समोर येतात, याकडे आता मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून निष्पक्ष तपास करून कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला उपस्थित झालेल्या पोलिसांच्या भूमिकेबाबतच्या प्रश्नांनंतर आता या प्रकरणातील तपासाची दिशा आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.