नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
व्हिडिओमध्ये वाहनचालक अत्यंत वेगाने वाहन चालवत असल्याचे आणि त्यानंतर वाहनाचा नागरिकांना धक्का बसल्याचे दिसून आले होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीने वाहन चालविणे नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याने संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी होत होती.
या गंभीर प्रकाराची दखल घेत काशीगाव पोलिसांनी संबंधित कारचालकाला अखेर अटक केली आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून माफीनामा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मिरा-भाईंदरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालविताना चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत भरधाव वाहनामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.
नवराष्ट्र डिजिटलने हा प्रकार सर्वप्रथम बातमीच्या माध्यमातून समोर आणत संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काशीगाव पोलिसांनी कारवाई करत चालकाला अटक केल्याने, मिरा-भाईंदरमध्ये या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील वाढती वाहतूक आणि वाहनांची संख्या पाहता बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिस व वाहतूक विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विशेषतः गर्दीच्या आणि रहिवासी भागांमध्ये भरधाव वाहनांमुळे पादचारी तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






