
नवराष्ट्राच्या बातमीचा दणका! गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाला जाग, मिरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांची डागडुजी सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष संदिप राणे यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाला दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली.
गणेशोत्सवासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शहरातील विविध भागांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपतींच्या मूर्तींचे आगमन सुरू होणार आहे. अशावेळी रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे गणेशमूर्तीला धक्का लागून विटंबना होऊ नये तसेच गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेने केली होती.
मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती ‘नवराष्ट्र’ने वृत्ताच्या माध्यमातून समोर आणली होती. त्यानंतर मनसेनेही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. या घडामोडीनंतर अवघ्या 24 तासांत महानगरपालिका प्रशासनाने विविध भागांतील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. प्रशासनाने काम सुरू केल्यामुळे मनसेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असले तरी केवळ काही ठिकाणी डागडुजी करून प्रश्न सुटणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे. “मनसेने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने 24 तासांच्या आत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले, ही नागरिकांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. मात्र, गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी शहरातील एकही धोकादायक खड्डा शिल्लक राहता कामा नये. प्रशासनाने कामात दिरंगाई केल्यास मनसे पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा मनसे शहर अध्यक्ष संदिप राणे यांनी दिला.
दरम्यान, खड्डे बुजवताना केवळ गणेशोत्सवापुरती तात्पुरती मलमपट्टी न करता दुरुस्तीचा दर्जा योग्य ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसामुळे पुन्हा काही दिवसांत खड्डे निर्माण होणार नाहीत, अशा पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आवश्यकता असून, महापालिका प्रशासनाने प्रमुख मार्गांसोबत अंतर्गत रस्त्यांवरील धोकादायक खड्ड्यांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सव तोंडावर असताना मिरा-भाईंदरमधील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मोठे आव्हान आता महानगरपालिका प्रशासनासमोर आहे. सुरू करण्यात आलेले काम किती वेगाने आणि कोणत्या दर्जाने पूर्ण होते, याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे. मनसेनेही रस्ते दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले असून, कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.