
SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख १४ हजार ९५० मतदार आहेत. त्यापैकी तब्बल २ लाख १३ हजार १८७ मतदारांचा एसआयआर मोहिमेदरम्यान शोध लागलेला नाही. हे प्रमाण एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे ४१.४ टक्के आहे. दुसरीकडे, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील एकूण ५ लाख ६७ हजार ९७२ मतदारांपैकी २ लाख ५० हजार ९८५ मतदार एसआयआर मोहिमेत सापडलेले नाहीत. हे प्रमाण तब्बल ४४ टक्के आहे. दोन्ही मतदारसंघांचा विचार केला असता एकूण १० लाख ८२ हजार ९२२ मतदारांपैकी सुमारे ४ लाख ६४ हजार १७२ मतदार शोधमोहिमेत आढळून न आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. हे प्रमाण सुमारे ४३ टक्के इतके आहे.
Nagpur News : १४ लाखांवर मतदार गळणार? एसआयआरसाठीची मुदत संपली,अर्ज अप्राप्त
मतदार यादीत एखाद्या मतदाराचे नाव नोंदविले गेले असताना एसआयआरच्या प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान त्याच मतदाराचा शोध का लागला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांचा शोध लागला नसल्याने मतदार यादी तयार करताना झालेल्या नोंदणी प्रक्रियेची आणि त्यातील नोंदींचीही तपासणी होण्याची गरज व्यक्त होत आहे. एसआयआर मोहिमेदरम्यान काही मतदारांची दुबार नावे, काही मतदार मयत असल्याचे, तर काही मतदार परराज्यातील असल्याचे निदर्शनास आले. काही मतदारांच्या नावांची नोंद असली तरी ते संबंधित पत्त्यावर वास्तव्यास नसल्याचेही आढळून आले आहे.
या प्रकरणात संबंधित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी (BLO) पडताळणी करून पंचनामे तयार केले आहेत. त्यामुळे शोध न लागलेल्या किंवा वगळण्यात येणाऱ्या मतदारांना आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी हरकत नोंदविण्याची संधी निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
एसआयआरनंतर ज्या मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्यात आली आहेत, त्यांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीतून नाव वगळण्यात आलेल्या मतदारांना हरकत दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्राप्त हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
एसआयआरच्या कामासाठी महापालिकेसह शिक्षक, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयातील कामातून कार्यमुक्त करून मतदार पडताळणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने संबंधित कार्यालयांतील दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला होता.
राज्य निवडणूक आयोग तसेच मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एसआयआरचे काम पूर्ण केले.
मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील २ लाख १३ हजार १८७ मतदारांचा शोध न लागणे हा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. एकूण ५ लाख १४ हजार ९५० मतदारांपैकी ४१ टक्क्यांहून अधिक मतदार एसआयआरमध्ये आढळून न आल्याने आगामी प्रारूप मतदार यादीकडे राजकीय पक्षांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात येतो. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील आकडे एकत्रित पाहता सुमारे ४३ टक्के मतदारांचा शोध न लागल्याचे चित्र समोर आले आहे.
आता ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत नेमकी किती नावे कायम राहतात आणि किती नावे वगळली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच वगळण्यात आलेल्या मतदारांकडून किती हरकती दाखल होतात आणि त्यापैकी किती मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट केली जातात, यावर या संपूर्ण एसआयआर मोहिमेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
‘SIR’वरून विजय वडेट्टीवार आक्रमक; सरकारवर केला घणाघाती हल्ला