फोटो सौजन्य- pinterest
सिद्धेश प्रधान/नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर महत्त्वाचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते बुधवार, दि. ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०२:०० वाजेपर्यंत (एकूण १६ तास) मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सम्पचा चॅनेल विलग करण्यासाठी एम.एस. प्लेट बसवणे.
भोकरपाडा येथे नवीन मीटरिंग किऑस्क आणि २०५० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसवणे.
सी.बी.डी. सेक्टर-७ येथे मोरबे मुख्य जलवाहिनीवर १८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे.
वाशी येथील अरेंजा सर्कलजवळ ७०० मि.मी. आणि महापे येथे ९०० मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे.
या १६ तासांच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सर्व विभागांमधील पाणीपुरवठा बंद राहील. याशिवाय सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सर्व नागरिकांना या कालावधीत पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शहर अभियंता शिरीष अरवाड यांनी केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी ६ ऑक्टोबरपूर्वी घरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे आणि पाणी जपून वापरावे.
या १६ तासांच्या पाणीबंदीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असली तरी, भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही देखभाल आणि दुरुस्तीची कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






