रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण
पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे मीरा-भाईंदर शहरासह वसई-विरार आणि पालघर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयात दररोज ५०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जाते, तर सुमारे १०० रुग्ण विविध विभागांमध्ये दाखल असतात. अशा मोठ्या रुग्णालयातील चार लिफ्टपैकी तीन लिफ्ट दीर्घकाळ बंद असल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकमेव सुरू असलेल्या लिफ्टवर रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि नातेवाइकांचा भार पडत असल्याने लिफ्टसाठी गर्दी होत असल्याची तक्रार आहे.
रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर महिला विभाग आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे गर्भवती महिला आणि महिला रुग्णांना जिन्याचा वापर करावा लागत असल्याची तक्रार आहे. आजारपण किंवा शस्त्रक्रियेनंतर अशक्त असलेल्या रुग्णांसाठीही जिन्याचा वापर करणे त्रासदायक ठरत आहे.
दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागासह इतर उपचार विभाग आहेत. या विभागांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नातेवाइकांनाही लिफ्टअभावी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लिफ्टच्या समस्येबरोबरच रुग्णालयातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून रुग्णालयाला पाणीपुरवठा केला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल असताना पाणी अपुरे पडल्याने स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील स्वच्छता ही थेट रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी होत आहे.
राज्य शासनाच्या अखत्यारीतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची असून, तळमजला अधिक चार मजली अशी इमारत आहे. येथे प्राथमिक उपचारांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या रुग्णालयावर परिसरातील मोठ्या लोकसंख्येचा भार आहे. अशा परिस्थितीत मूलभूत सुविधांपैकी लिफ्ट आणि पाणीपुरवठ्यासारख्या सुविधांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे.
रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे, अस्वच्छता, सुरक्षाविषयक त्रुटी, पाणीपुरवठा आणि इतर समस्यांबाबत रुग्ण कल्याण समितीकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ओमप्रकाश गरोडिया यांनी या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे. या समस्यांबाबत ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आल्याचे गरोडिया यांनी सांगितले.
चारपैकी तीन लिफ्ट दीर्घकाळ बंद असताना त्यांची दुरुस्ती अद्याप का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी लिफ्टची नियमित देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लिफ्ट दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याबाबतची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तीन लिफ्ट नेमक्या कधीपर्यंत सुरू होणार आणि रुग्णालयातील पाणीपुरवठ्याची समस्या कधी सुटणार, याकडे आता रुग्ण आणि नातेवाइकांचे लक्ष लागले आहे.
Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था






