संग्रहित फोटो
मुंबई : रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडीच्या अपघात (Malgadi Accident) घडल्याची माहिती प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आल्याची माहिती आहे. त्या दिवशी अपघात घडला त्या ठिकाणी रेल्वेने त्याचदिवशी रेल्वे रुळाखालील सिमेंटचे सहा स्लीपर बदलण्यात आले होते. मात्र, हे स्लीप व्यवस्थित लागले की नाही याची खात्री केली नसल्याने स्लीपर तुटून अपघात घडला असल्याची माहिती रेल्वेच्या (Railway Accident) प्राथमिक चौकशी अहवाल समोर आली. त्यामुळे दोषी रेल्वे अधिकाऱ्याला रेल्वेकडून चार्जशीट दिल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी दुपारी पनवेल-कळंबोली दरम्यान, मालगाडी घसरल्यामुळे लांब पल्याच्या मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले होते. याचा परिणाम रविवारी दिवसभर होता. त्यामुळे कोक णात जाणाऱ्या एक्स्प्रेस अनेक तासांच्या विलंबाने धावत होत्या. जिथे मालगाडीचा अपघात घडला त्या ठिकाणी नाला आहे. त्याला लागून असलेले रुळाखालचे स्लीपर खराब झाल्याने मध्य रेल्वेने तिथले सहा स्लीपर बदलले होते. मात्र, बदलण्यात आलेल्या स्लीपरनंतर रेल्वे रूळावरून कोणतीही गाडी जाण्याआधी त्याची तपासणी करून बंधनकारक होते.
मात्र, सदरचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर लोडेट मालगाडी गेल्यानंतर स्लीपर तुटून घसरल्याचे रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला चार्जशीट दिल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.