सातारा : पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा व सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थेचे फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व सेवक सहकारी पतसंस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सहकार व पणन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेस राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांचे अनिल कवडे, कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. बँकांच्या ठेवीवर संरक्षण मिळते. तसेच पतसंस्थांच्या ठेवीवर संरक्षण कसे मिळावे यासाठी सहकार विभागाकडून अभ्यास करण्यात आला आहे. बँका ज्याप्रमाणे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्याप्रमाणे पतसंस्थांनी काळाप्रमाणे बदलले पाहिजे. संस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी आर्थिक शिस्तही पाळली पाहिजे.
ज्या उद्देशाने पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच उद्देशाने संस्था चालवावी. गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोना संकटामुळे अनेक संस्थांना अडचणी आल्या. संस्थांना आर्थिक शिस्त लागावी व संस्था वृद्धिंगत व्हावी यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहे. सहकारी संस्थांनी दूरदृष्टी ठेवून लोकांच्या हितासाठी कामे करावे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.